preloader

मंदिराचा इतिहास

श्री देव एकनाथ मंदिराला एक मनोरंजक इतिहास आहे. हर्णैमध्ये फार वर्षांपूर्वी कै. गैलाड नावाचे एक संतप्रवृत्त नाथभक्त राहत असत. एकदा त्यांचे स्वप्नात श्री एकनाथ महाराज आले व त्यांनी मी हर्णैत येणार आहे, तर तू पंढरपूरला ये व मला घेऊन जा असा दृष्टांत दिला.

लगेच श्री. गैलाड पंढरपूरला गेले. तेथे गेल्यावर मात्र पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर ते तेथेच रमून गेले. आध्यात्मिक प्रवृत्ती स्थिरावून ते तेथेच रंगले व नाथांचा दृष्टांत विसरले.

नाथभक्ताचे स्वप्न

नाथांनी त्यांना पुन्हा त्यांचे स्वप्नात येऊन आठवण केली व पादुका कोठे आहेत हेही सांगितले. त्यामुळे मात्र श्री. गैलाड चंद्रभागेत पोहचले व पादुका घेऊन हर्णैस परतले. तो मोठा भाग्याचा दिवस होता. ग्रामस्थांनी त्यांच्या परीने आनंद सोहळा साजरा केला व एका केमळी झोपडीत नाथ पादुकांची स्थापना केली.

गावात श्री नाथ महाराजांचे स्थान निर्माण झाले. तेथेच ग्रामस्थ पुजा, आरती, कथा, प्रवचन करू लागले. याचवेळी नाथांनी पैठण येथील भक्त मंडळींसही दृशांत दिला. नाथ महाराज हर्णै येथे वास्तव्यास गेले असल्याने भक्तमंडळी पैठणहून हर्णै येथे आली.

पादुका स्थापना

ही घटना सुमारे २२० वर्षांपूर्वीची आहे. श्री क्षेत्र पैठण प्रमाणे हर्णै येथेही श्री नाथ महाराजांचा उत्सव तेव्हापासून सुरु झाला. त्याचवेळी किल्ले सुवर्णदुर्ग हा सरदार आंग्रे यांचे स्वाधीन होता. त्यांनाही नाथांच्या पादुकांचे दर्शनाची इच्छा झाली. त्यांना दर्शनाने परमानंद झाला. त्यांनी लगेच ग्रामस्थांनी उभारलेल्या केमळी ऐवजी आत्ताचे मंदिराची उभारणी केली. मंदिर व्यवस्थेसाठी आंग्रे यांनी दरसाल रु. ५० सनद चालू केली होती.

प्रथम जीर्णोद्धार ग्रामस्थ कै. वासुदेव नारायण गोळे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने वर्गणी काढून केला. तोवर उत्सव फक्त फाल्गुन वद्य षष्ठीचे दिवशीच होत असे. पुरण पोळीचा नैवेद्य व सर्व ग्रामस्थांना प्रसादाचे जेवण त्या दिवशी होत असे.

मंदिर उभारणी

नाथांचा अनुग्रह, जन्म व महानिर्वाण याच तिथीला असल्याने नाथांचा उत्सव हाच फाल्गुन वद्य षष्ठीस केला जातो.

हर्णै येथील नाथ मंदिर दर्यासागर आंग्रे यांनी त्यांचे सुनेचे नावे इ. स. १७६० मध्ये बांधले असे बखरीवरून दिसते. सुमारे इ. स. १८०० चे सुमारास श्री. गैलाड बुवांनी हे मंदिर ग्रामस्थांचे ताब्यात दिले असावे. त्या वेळेपासून ग्रामस्थांनी मंदिराचे कारभारी म्हणून काम केले असावे असे दिसते.

त्यानंतर सर्वश्री विष्णुपंत चौघुले, बाळाजी बाबाजी गोळे, नारो बाळाजी (बाबजी) गोळे, सखाराम नारायण चौघुले यांनी व नंतर १८९६ पासून वासुदेव नारायण गोळे आणि नंतर सन १९१० पर्यंत विठ्ठल बाळकृष्ण चौघुले, सन १९२५ पर्यंत अवधूत नारायण गोळे, सन १९२६ पर्यंत स. दा. आघारकर व ना. रा. कार्ले, सन १९२७ पर्यंत मधुसूदन वासुदेव गोळे, सन १९३४ पर्यंत जी. व्ही. गोखले व त्यानंतर सर्वश्री द. ह. पटवर्धन, जी. व्ही. गोखले, शंकर हरी जोशी तसेच अनेक मंडळींनी मंदिराचे कारभारी, प्रमुख, विश्वस्त म्हणून कारभार पाहिला.

उत्सव व कारभार