आरती एकनाथांची
आरती एकनाथा ।। महाराजा समर्था ।।
त्रिभुवनी तूंचि थोर ।। जगद्गुरू जगन्नाथा ।। धृ ।।
एकनाथ नाम सार ।। वेदशात्रांचे गूज ।।
संसार दुःख नासे ।। महाराजांचे बीज ।। आरती ।। १ ।।
एकनाथ नाम घेतां ।। सुख वाटले चित्ता ।।
अनंत गोपाळदास ।। घणी न पुरे गाता ।। आरती ।। २ ।।
श्री एकनाथ महाराजांचा अखेरचा दिव्य संदेश
आम्ही संसारा अगस्त्य येणें । करोंनी हरिभक्ति जडजीव उद्धरणे ।
साच असते जरी, तरी धाक धरितों चित्ती । भवभय समूळ मिथ्या ।। १ ।।
जैं धर्माची वाट मोडे । अधर्माची शीग चढे ।
तैं आम्हा येणे घडे । संसारस्थिति ।। २ ।।
नानामते पाखांडे । कर्मठता अति वांडें ।
त्यांची ठेचावी तोंडे । हरिभजनें ।। ३ ।।
जें जें हरीचें लीलाचरित । तें तें माझेचि स्वतंत्र ।
देव भक्त एकत्र । भेद नाही ।। ४ ।।
जो जो अवतार हरि घरी । तो तो मीच अवधारी ।
हरिनाम गजरी । जगदोध्दारी ।। ५ ।।
सर्वांभूतीं भगवद्भावो । भक्तीचा निजनिर्वाहो ।
धर्मांचा आग्रहो । वाढणे ।। ६ ।।
सर्वांभूती दया शांती । प्रतिपाळावी वेदोक्त्ती ।
हेही एक निश्चितीं । करणें आम्हां ।। ७ ।।
लीलाविग्रही भगवंत । तया म्हणती नित्यमुक्त ।
आम्ही काय तेथें । वेगळे असो ।। ८ ।।
विश्वरूप सृष्टी । अर्जुना दावी दिठी ।
भिन्न भेदाची गोष्टी । बोलू नये ।। ९ ।।
वत्सहरणाचे चरित्र । वत्सें गोवळे स्वयें स्वतंत्र ।
पावे पायतणें कटिसूत्र । आपण जाला ।। १० ।।
एकाजनार्दनी । विश्वरूप गोविंद ।
भेद धरी तो चित्ती । निंद्याहूनी अति निंद्य ।। ११ ।।