preloader

उत्सव / इतर कार्यक्रम

वार्षिक कार्यक्रम


चैत्र महिन्यातील हळदी कुंकू

चैत्र महिन्यात महिला वर्गाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आणि त्यात देवीची उत्तम प्रकारे आरास केली जाते, त्यात वेगवेगळी फळे आणि पदार्थ देखील मांडले जातात ज्याने एकूणच शोभा वाढते. आळीतल्या महिला गावातल्या येणाऱ्या महिलांची ओटी भरतात. आणि या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे आंब्याची डाळ आणि पन्हे कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांना दिले जाते.

गोकुळ अष्टमी

गोकुळाष्टमीच्या दिवशी संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात नाथपादुकांसमवेत सर्व गोविंदा फळी धरून नाचतात आणि शेवटी हंडी फोडून प्रत्येक घरी गोविंदा खेळायला बाहेर पडतात.

अश्विन महिन्यातील भोंडला

अश्विन महिन्यामध्ये घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत महिला भोंडला खेळतात. या कार्यक्रमाची मोठी खासियत म्हणजे भोंडला संपल्यानंतर प्रसादासाठी खाऊ काय आणला आहे हे ओळखणे. विशेषकरून लहान मुले या खेळाचा खूपच आनंद लुटतात.

भजनाचा वर्धापनदिन

अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच घटस्थापना हा दिवस पुरुषांच्या भजन मंडळाचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो. त्यादिवशी एखादे प्रवचन/ कीर्तन/ भजन किंवा मग एखाद्या नवीन विषयावरील माहिती देण्यासाठी वक्ता बोलावणे असे विविध कार्यक्रम आयोजिले जातात.

दसरा

दसऱ्याच्या दिवशी सर्व पुरुष मंडळी सोने (आपट्याची पाने) लुटण्यासाठी मंदिरात जमतात आणि सोने लुटून झाले की देवाला सोने वाहून, आपसात सोन्याची देवाण-घेवाण करून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. तसेच, त्यानंतर सगळ्यांनी एकत्र मिळून श्री कमळेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी जाण्याची पद्धत आहे. वाटेत जी लोकं भेटतील त्यांना सोने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात.

दिवाळी आणि दीपोत्सव

दिवाळीच्या पहिल्या दिवसाची म्हणजेच नरकचतुर्दशीची आंघोळ झाली की सकाळी लवकर साधारण ६ च्या सुमारास सर्व मंडळी छान तयार होऊन नाथ मंदिरात दर्शनासाठी जमतात. दर्शन झाले की सगळ्यांनी एकत्र पुढील दर्शनासाठी श्री कमळेश्वर मंदिर आणि श्री मुरलीधर मंदिर येथे जाण्याची पद्धत आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी नाथ मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो. या दीपोत्सवाचे वैशिष्ठ्य म्हणजे विविध प्रकारची फुले, शोभेच्या झाडांची पाने यापासून तयार केलेल्या वेगवेगळ्या रांगोळ्या आणि त्या रांगोळ्यांच्या बाजूने लावलेल्या पणत्या! या दीपोत्सवाची तयारी साधारण १-२ दिवस आधी सुरु होते आणि यात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवर्जून सहभागी होतात. पौर्णिमेच्या संध्याकाळी पणत्यांच्या कोमल प्रकाशातील दीपोत्सवाचे दृश्य अक्षरशः मोहून टाकते.

होळी आणि पोपटी

फाल्गुन शुद्ध पंचमीला म्हणजेच होळीच्या पहिल्या दिवशी सर्व ग्रामस्थ नाथ मंदिरात जमतात आणि होळीचा पहिला दिवस म्हणून दरवर्षी एखादा नवीन पदार्थ करून त्याचा आस्वाद घेतला जातो. त्यानंतर मंडळी होळीच्या ठिकाणी जायला निघतात.
होळीसाठी लागणारे साहित्य म्हणजे वाळलेली लाकडे, वाळलेले गवत इत्यादी गोळा करून ते हातगाडीवरून होळीच्या जागी नेण्यात एक वेगळीच मजा असते. आणि पहिली होळी लावून झाल्यानंतर नाथांच्या उत्सवातील सजावटीचे वारे वाहू लागतात.

श्री एकनाथषष्ठी उत्सव

फाल्गुन वद्य प्रतिपदेपासून संत एकनाथ महाराजांचा उत्सव सुरु होतो आणि फाल्गुन वद्य अष्टमीला रथयात्रेने उत्सवाची सांगता होते. या उत्सवात प्रतिपदा ते षष्ठी असा नाथांचा उत्सव आणि सप्तमी व अष्टमी जगदंबा देवीचा उत्सव असतो. या उत्सवातील काही केंद्रबिंदू म्हणजे ६ दिवसांची भाऊचा धक्का ते नाथ मंदिर अशी होणारी पदयात्रा, ह. भ. प. श्री. चारुदत्त आफळे यांची कीर्तनसेवा, षष्ठीच्या दिवशी होणारी दरबारी तुला, अष्टमीला होणारी रथयात्रा आणि इतर काही कार्यक्रम.


दैनंदिन कार्यक्रम


भजन

महिला ग्रामस्थ (दर बुधवारी सायंकाळी)
कलावती आईंचे भजन, सिद्धकला भजनी मंडळ, हर्णै (दर गुरुवारी दुपारी)
पुरुष ग्रामस्थ (दर शनिवारी रात्री)

बालोपासना

दर रविवारी सकाळी